पुणे- कोलकत्तादरम्यान धावणाऱ्या ‘आझाद हिंद’ ला लेटमार्क ; प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले..

पुणे: पुणे-कोलकाता दरम्यान धावणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेसचे वेळापत्रक गेल्या तीन महिन्यापासून चुकल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा आहे.वारंवार होणाऱ्या विलंबाने प्रवाशांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
पुणे रेल्वे विभागातून सर्वांत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांपैकी आझाद हिंद एक्स्प्रेस ही एक महत्त्वाची रेल्वे आहे. पुणे ते हावडा ही गाडी पुण्यातून सकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी सुटते, तर हावडा येथून ती रात्री ९.४०ला पुण्यासाठी सुटते. या गाडीला मार्गावर एकूण २८ थांबे आहेत, पण गेल्या वर्षभरात या गाडीला होणाऱ्या उशीरामुळे ही गाडी चर्चेत आहे. गाडीला रोजच उशीर होत असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.गेल्या तीन महिन्यांत गाडीला तब्बल ६९ दिवस उशीर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून काहीही उपायोजना केली जात नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान गेल्या आर्थिक वर्षांत या गाडीच्या ३६५ दिवसांपैकी १७१ दिवस ही गाडी उशीराने पुणे रेल्वे स्थानकावरून सुटली. गाडीला उशीर झाल्याच्या दिवशी गाडीला पुण्यात पोहचण्यास उशीर झाला होता. गेल्या वर्षात या गाडीला एक तासापासून १२ तासांपर्यंत उशीर झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. या गाडीचे वेळापत्रक वेळेत सुरू करण्यासाठी प्रवाशांकडून मागणी होत आहे.