पुणे बालिका अत्याचार प्रकरण; आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द

पुणे : विद्येच माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. वेल्हे तालुक्यातील पानशेतजवळील कुरण खुर्द येथून एका अडीच वर्षाच्या चिमुकलीच अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा खून करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी नराधम आरोपीला पुण्याच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र आता पुणे न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या प्रकरणात नव्याने युक्तिवाद ऐकण्याचे आदेश पुणे न्यायालयाला दिले आहेत.

संजय बबन काटकर( वय 38 वर्ष, रा. कादवे, पानशेत, वेल्हे, )असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कुरण खुर्द येथील वस्तीत 15 फेब्रुवारी 2021 रोजी घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीचे रिक्षातून अपहरण झाले होते. दरम्यान एका रिक्षातून मुलीला पानशेत रस्त्यावरील मालखेड येथे नेले अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. दुसऱ्या दिवशी हवेली तालुक्यातील मालखेड-थोपटेवाडी रस्त्यावरील पुलाच्या सिमेंटच्या मोरीत या मुलीचा मृतदेह आढळला होता.या मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले होते. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात केली होती. त्यानुसार वेल्हे पोलिसांनी दहा ते बारा किलोमीटरची पायपीट करून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाटेगावमध्ये वीट भट्टी वरून आरोपीला ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयातआरोप पत्र दाखल झाल्यानंतर वर्षभरात आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान या खटल्यात महत्त्वाचा पुरावा ठरलेला ‘डीएनए’ चाचणी अहवाल तयार करणाऱ्या तज्ज्ञांची साक्ष व उलटतपासणी नोंदवून आरोपीला स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण संधी मिळायला हवी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
