Pune Ganpati Visarjan : पुढच्या वर्षी लवकर या!!! पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अखेर संपली, मिरवणुकीस लागले तब्बल ‘इतके’ तास..
Pune Ganpati Visarjan : पुणे गणेश विसर्जन मिरवणूक (Pune Ganpati Visarjan) शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले.पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक संपण्यासाठी तब्बल २८ तास ४० मिनिटे लागली. शेवटच्या उंबऱ्या गणपती मंडळाच्या विसर्जनाने ही मिरवणूक संपली.
महत्वाच्या गणपती मंडळांनी उशीर केल्याने यंदा मिरवणूक खोळंबली. लवकर मिरवणूक संपवण्याचा दावा मात्र फोल ठरला. साधारण २९०५ गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला. (Pune Ganpati Visarjan)
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशांचे पथकाबरोबर भव्य दिव्य देखावे भाविकांना पाहण्यास मिळाले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीतून दिसेल. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रोड आणि टिळक रस्त्यावर अलोट गर्दी झाली होती.
सर्वदूर प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नऊ वाजण्याच्या आत विसर्जन देखील झाले. या मंडळाने ऐतिहासिक नोंद केली मात्र, त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच होऊ शकली नाही.
कारण दगडूशेठ नंतर या मंडळांऐवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. या मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणूक रात्री दीड वाजल्यानंतर देखील सुरुच झाली नाही.