पुण्यात दोन गुंडांच्या टोळ्यांचा राडा; एकमेकांवर कोयता, तलवारीने हल्ला…!
पुणे : मोटारसायकल हळू चालव, असे सांगितल्याच्या कारणावरुन दोन गुंडांच्या टोळ्यांनी मार्केटयार्डमधील आंबेडकरनगरमध्ये भरदिवसा हैदोस घातला. एकमेकांवर तलवार, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मार्केटयार्ड पोलिसांनी दोन्ही गटातील मिळून ८ जणांना अटक केली आहे.
याबाबत अनिलसिंग ऊर्फ बु सिंकदरसिंग टाक याने मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दत्ता भिसे, नितीन भिसे, विजय भिसे यांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी ११ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टाक व आरोपी हे एकाच परिसरात रहायला आहेत. दत्ता भिसे याचा पुतण्या आकाश भिसे हा फिर्यादीच्या घरासमोरुन भरधाव वेगाने मोटारसायकल घेऊन जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला मोटारसायकल हळू चालवत नेत जा असे सांगितले.
याचदरम्यान राग मनात धरुन दत्ता भिसे व इतर ८ जण हातात कोयते व काठ्या घेऊन आले. त्यांनी फिर्यादीवर कोयत्याने व काठीने मारहाण करुन दहशत निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करीत आहेत. याविरोधात दत्ता महादेव भिसे याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पिटुसिंग दुधानी, अनिलसिंग सिकंदरसिंग टाक, सिकंदरसिंग राजुसिंग टाक, रोहित दुधानी यांना अटक केली आहे.