Pune : आळंदी म्हातोबाची येथे शेतात मोटार बंद करायला गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू, नागाने दंश केल्याने घडली दुःखद घटना…
Pune उरुळी कांचन : शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नागाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
चित्रसेन पांडुरंग जवळकर (वय -३५, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे त्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे .चित्रसेन जवळकर हे आळंदी म्हातोबाची येथील श्री म्हातोबा जोगेश्वरी नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष होते.
मिळालेल्या माहिती नुसार, गुरुवारी (ता.२८) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक त्यांना नागाने दंश केला. त्यामुळे ते ओरडले. त्यांचा आवाज ऐकून लोकवस्तीतील नागरिकांनी तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले.
मात्र, तोपर्यंत चित्रसेन हे घाबरून बेशुद्ध पडले होते. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी रिक्षातून लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. Pune
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आळंदी म्हातोबाची परीसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, भावजय, एक मुलगा, पुतणी, पुतण्या असा परिवार आहे.
अत्यंत शांत, संयमी, हसतमुख असलेल्या चित्रसेन यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेने आळंदी म्हातोबाचीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.