Pune : सर्वर प्रॉब्लेममुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास, पुणे जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांना मिळेना धान्य…

Pune : हवेली तालुका तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सर्वर प्रॉब्लेम असल्याकारणाने पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे धान्य अजूनही मिळाले नाही. स्वस्त धान्य दुकानांमधून ईपॉस मशीनवर बायोमेट्रिक केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना धान्य प्रति महिना मिळत असते.

परंतु या महिन्यांमध्ये जवळजवळ मागील पंधरा दिवस सर्वरचा प्रॉब्लेम असल्याकारणाने आजपर्यंत गरीब पात्र लाभार्थ्यांना महिन्याचे रेशन मिळालेले नाही. रोज पात्र लाभार्थी दुकानावर येतात. दुकान उघडे करून दुकानदार मशीन चालू होण्याची वाट पाहत असतात.
मशीन चालू झाली नाही, तर साडेअकरा बारा वाजेपर्यंत पुन्हा लोकांना उद्या या असं सांगून परत पाठवावे लागत आहे. यामुळे दुकानदारांचा मनस्ताप तर होत आहे, शिवाय पात्र लाभार्थी या महिन्यात धान्यापासून वंचित राहील की काय? ही भीती निर्माण झालेली आहे.

राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्य सचिवांबरोबर बैठक झालेली आहे. या बैठकीत सर्वरची अडचण दूर करू असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ही अडचण अजूनही दूर झालेली नाही. परिणामतः या महिन्याचे धान्याच्या संदर्भात गोरगरीब पात्र लाभार्थ्यांच्या मनामध्ये धान्य बुडेल की काय? अशी शंका निर्माण झालेली आहे. Pune
तसेच राज्य संघटनेने 5 ऑगस्ट या दिवशी सर्वर अडचण जर दूर झालीच नाही तर दुकानदारांना मिळालेल्या ई-पॉस मशीन शासनाकडे परत देण्याच्या बाबतीत आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे. हवेली तालुका मधून सुद्धा असे आंदोलन हवेली तहसीलदार कचेरी येथे 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.
संघटनेच्या अध्यक्षा हेमलता बडेकर, उपाध्यक्ष सागर शहा, आणि सचिव महेंद्र सरोदे आणि हवेलीतील अनेक सभासद दुकानदारांनी अशी माहिती दिलेली आहे.