Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाला भेट….
Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या हडपसर येथील राजर्षी शाहू महाराज संकुलामधील स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी नाट्यगृहाचे सौंदर्य अबाधित राहील यादृष्टीने स्वच्छता, नियमित देखभाल दुरुस्ती याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त (सांस्कृतिक) सुनील बल्लाळ, मुख्य अभियंता (भवन) युवराज देशमुख, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक सुनील बनकर आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, पुणेकरांना मुळातच नाटकाची आवड आहे. त्यामुळे येरवडा, वडगाव शेरी, पिंपरी- चिंचवड आदी भागांसह हडपसर येथे अद्ययावत नाट्यगृह असण्याची गरज होती. हडपसर येथे स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे काम झाल्यामुळे येथील नाट्यप्रेमी, कलाप्रेमींना लाभ होणार आहे.
यावेळी आयुक्त डॉ. भोसले यांच्याशी चर्चा करताना ज्या इमारती अगदी थोड्या निधीअभावी अपूर्ण आहेत त्या पूर्ण कराव्यात असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यानुसार २२ अपूर्ण इमारतींना प्राधान्याने निधीची तरतूद करुन पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
नाट्यगृहाचे भाडे १० हजार रुपये ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यावर नाट्यनिर्माते, दिग्दर्शकांशी बैठक घेऊन महानगरपालिकेलाही परवडेल आणि नाट्यनिर्मात्यांनाही परवडेल असे भाडे निश्चित केल्यास अधिकाधिक नाटकांचे खेळ होऊन महापालिकेला नाट्यगृहाच्या देखभालीसाठी उत्पन्न मिळू शकेल. नाट्यगृहाच्या छतावर सौर पॅनेल बसून वीज निर्मिती करता येईल तथापि, छोट्या आकारात जास्त वीज तयार करणारे अत्याधुनिक सौर पॅनेलचे तंत्रज्ञान येत असल्याने त्यादृष्टीने निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाची वैशिष्ट्ये…
पुणे महानगरपालिकेच्यावतीने सन २०११ साली हडपसर येथे एकूण २ एकरात ५ हजार ७६७ चौ.मी. क्षेत्रफळाचे स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. या नाट्यगृहाची तळमजला व ३ मजले अशी रचना करण्यात आली आहे. तळमजल्यावर लोडिंग अनलोडिंग रॅम्प, तिकीट कक्ष, कॅफेटेरिया आहे. नाट्यगृहाची एकूण आसन क्षमता ८३८ इतकी असून स्टेजसमोर ६५९ आसणे व बाल्कनीमध्ये १७९ इतकी आसन अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ९० बाय ४५ फूट मापाची भव्य रंगभूमी (स्टेज) उभारण्यात आली आहे.
समोरील भागात मोठा आकर्षक व प्रशस्त प्रवेशमार्गिका करण्यात आला आहे. नाट्यगृहाच्या तळ मजला येथे अतिमहत्वाच्या व्यक्तींकरता कक्ष असून तळमजला व पहिला मजला येथे एकूण १० ग्रीन रूम्स आहेत. येथे १०७ चारचाकी व ३५७ दुचाकी वाहनांकरीता वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
संपूर्ण नाट्यगृह अद्ययावत सुविधांनी युक्त असून वातानुकुलीत असून सिलिंगला व भिंतीला अकॉस्टिकल प्रक्रिया करण्यासाठी सलून स्लॅटचा वापर करण्यात आला आहे. तसेच त्यामध्ये स्टेच फॅब्रिकचा वापर डिझाईनसाठी करण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज संकुलामध्ये तिसऱ्या मजल्यावर चित्रप्रदर्शनासाठी व कलाप्रेमींसाठी सुमारे १० हजार चौरस फुटाचे कलादालन करण्यात आलेले आहे. या सर्व कामाकरीता सुमारे ५० कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे.