Pune : सोळा हजार मिळकतींची महापालिकेकडे नोंद करण्यास विलंब; वाघोली, नऱ्हे आणि मांजरी बुद्रुकच्या ३७ मिळकत कर निरीक्षकांचे वेतन थांबवले…

Pune : समाविष्ट गावांतील ग्राम पंचायतींकडील मिळकतींच्या नोंदी विहीत मुदतीत मिळकत कर विभागाकडे न घेणार्या वाघोली, नर्हे आणि मांजरी बुद्रुक या तीन गावांतील तब्बल ३७ मिळकत कर निरीक्षकांचे वेतन थांबविण्यात आले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली आहे.

महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांतील ग्रामपंचायतींकडे नोंद असलेल्या मिळकतींच्या नोंदी महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे घेण्याची मोहीम प्रशासनाने राबविली होती. हे काम मागीलवर्षी नोव्हेंबरपर्यंत होणे अपेक्षित होते.

मात्र, व्यावसायीक मिळकती तसेच मोठे गृहप्रकल्प असलेल्या वाघोली, नर्हे आणि मांजरी बुद्रुक या तीन गावांतील तब्बल सोळा हजार मिळकतींची नोंद महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडे झालेली नाही. Pune

विशेष असे की मागील तीन वर्षांपासून मिळकत कर विभागाने सर्वसाधारण सभेच्या आदेशानुसार या गावांमधील मिळकतींना मिळकत करांची बिले पाठविली असून करही गोळा करायला सुरूवात केली आहे.
दरम्यान, वाघोली, नर्हे आणि मांजरी बुद्रुक या गावातील सोळा हजारांहून अधिक ग्राम पंचायतींकडे नोंद असलेल्या मिळकतींची मिळकत कर विभागाकडे नोंदणीच झालेली नाही. ही बाब लक्षात आल्याने मिळकत कर विभागाने वेळोवेळी संबधित निरीक्षकांना नोटीसेस दिल्या आहेत. अखेर या महिन्यांत या निरीक्षकांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
