Pune Crime : धक्का लागल्याने ६ अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा खून, पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर…
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने सहा अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला बेदम मारहाण करुन खून केल्याची धक्कादायक घटना भोसरी परिसरात घडली आहे. ही घटना भोसरी येथील शांतीनगर येथे शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली आहे.
किरण बाळू लेंढघर (वय.२८ रा. शांतीनगर, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल बाळू लेंढघर (वय.३२ , रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी रविवारी (ता.२१) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांवरगुन्हा दाखल केला.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी यांचा भाऊ किरण हा शॉप बंद करुन शांतीनगर येथील घराकडे पायी चालत येत होता. घराजवळ असताना त्यांचा एका अल्पवयीन मुलाला धक्का लागला. Pune Crime
दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने किरण यांच्याशी वाद घातला. त्यांची बाचाबाची झाली. त्या रागातून अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून निशांत ए अमन मस्जिदसमोर किरण याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दारु पिलेल्या अल्पवयीन मुलाने सागर यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. किरण रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.