Pune Crime : आईच्या अपमानाचा बदला, तरुणाने सराफावर केले कोयत्याने वार अन्…,घटनेने उडाली खळबळ
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. Pune Crime
आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शनिवारी (ता.२) रात्री सव्वानऊच्या सुमारास लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात घडला आहे. याप्रकणी एकाला अटक करण्यात आली आहे.
युवराज अनिल गोरखे (वय. २४, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, याप्रकरणी त्याचा साथीदार सार्थक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय विमलचंद मेहता (वय.३८ रा. कुमार कॅसल सोसायटी, कॉन्व्हेंट स्ट्रीट, लष्कर) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. याप्रकणी मेहता यांचा भाऊ मनोज (वय.३९) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी गोरखे याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची आई मेहता यांच्याकडे कामाला होती. विजय आणि गोरखेची आई यांच्यात वाद झाला होता. विजय यांनी आईवर चोरीचा आरोप केला होता.
आईचा अपमान केल्याने गोरखे चिडला होता. शनिवारी (ता.२) रात्री सव्वानऊच्या सुमारास विजय यांना आरोपींनी लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात अडवले. गोरखे आणि साथीदाराने त्यांच्यावर कोयता उगारला. विजय घाबरून पळाले.
दरम्यान, आरोपींनी पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे प्रियंका शेळके करीत आहेत.