Pune Crime : पुण्यात घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा पहिल्या पतीने केला खून, खळबळजनक माहिती आली समोर…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोजन अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याच्या रागातून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराच्या मदतीने पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार शस्त्राने वार करुन खून केला .
सोनल उर्फ सुमित पाटेकर (रा. अग्रवाल प्राईड, पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकणी प्राजक्ता सोनल उर्फ सुमित पाटेकर (वय.३४ रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनि राजेंद्र मारटकर (रा. गवळी आळी, पुणे) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या हल्ल्यात प्राजक्ता या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.
सविस्तर माहिती अशी की, आरोपी सनी हा फिर्यादी महिलेचा पहिला पती आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर प्राजक्ता यांनी सुमित याच्यासोबत दुसरे लग्न केले. त्याचा राग आरोपी सनी याच्या डोक्यात होता.
यातूनच सनी याने आपल्या एका साथीदाराला सोबत घेऊन गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्राजक्ता यांच्या कसबा पेठेतील घरात घुसला. त्यावेळी प्रजक्ता, त्यांची सासू आणि पती गप्पा मारत बसले होते. काही समजण्याच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्राने समीत याच्यावर खुनी हल्ला केला.
त्याच्या डोक्यात, तोंडावर आणि हातावर सपासप वार केले. हा प्रकार पाहून प्राजक्ता पती सुमीत याला वाचवण्यासाठी मध्ये आले. आरोपींनी त्यांच्या डोक्यात व हातावर धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या सुमीत याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरा फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत अटक केली आहे.