Pune Crime : गाडी बाजूला घेण्यावरून झाला वाद, पीएमपी बस चालकाने सहकाऱ्याच्या कानाचा तोडला लचका, भेकराईनगर येथील घटना..

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
‘गाडी बाजूला घे’ असं सांगितल्याच्या कारणावरून एका ‘पीएमपीएमएल’ बस चालकाने सहकाऱ्याला मारहाण करीत त्याचा कानाचा लचका तोडला. चावा घेत त्याच्या कानाची पाळीच तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना भेकराईनगर बस डेपोमध्ये बुधवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Pune Crime
कोरे नावाच्या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी प्रदीप आण्णासाहेब सुतार (वय ४१, रा. काळेवाडी, पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी सुतार आणि कोरे हे दोघेही फुरसुंगी येथील भेकराईनगर बस डेपोमध्ये काम करतात. बुधवारी संध्याकाळी फिर्यादी सुतार हे त्यांच्या चारचाकी गाडीमधून जात होते. त्यावेळी आरोपीची गाडी मध्येच उभी होती.
फिर्यादी यांनी त्याला गाडी बाजूला घे असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करून हाताने मारहाण करायला सुरुवात केली. तसेच, त्यांच्या कानाचा चावा घेतला. कानाचा लचका तोडत कानाची पाळी तोडली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. सुतार यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.