Pune Crime : नोकरीच्या आमिषाने परदेशात महिलांची विक्री, आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक..

Pune Crime पुणे : नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तीन महिलांना आखाती देशात नेऊन त्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मुंबईतील माहिममधून मुंबईतील एजंटला अटक केली. याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (Pune Crime)
मोहम्मद अहमद याहया (वय. २८, रा. ओशिवरा, मूळ रा. कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे, तर त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत दोन महिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, पुणे शहरात राहात असलेल्या महिलांच्या गरिबीचा फायदा घेऊन मुंबई येथील एजंटने महिलांना जास्त पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून टुरिस्ट व्हिसावर सौदी अरेबियात पाठवले. महिलांना घर कामासाठी सौदी अरेबिया देशात पाठवून त्या बदल्यात तेथील घरमालकांकडून मोठी रक्कम घेतली.
तसेच महिलांना दरमहा ठरलेल्या पगारा पेक्षा कमी रक्कम दिली. घरकाम करणाऱ्या महिलांना तेथील घरमालकांनी गुलामासारखी वागणुक दिल्यानंतर महिलांनी एजंटकडे भारतात जाण्याची मागणी केली. त्यावेळी एजंटने त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन फसवणूक केली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एजंटची कोणतीही माहिती नसताना मुंबई येथील माहिम परिसरात शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या एजंटला मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी रिमांड दिली आहे.