Pune Crime : मोबाईल ठरलं कारण! पुण्यात मोबाईल देण्यास नकार दिल्याने चाकूने केले वार, उडाली खळबळ…
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
रिक्षातून आलेल्या चार जणांनी एका तरुणाकडे मोबाईलची मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच धारदार चाकूने हातावर वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे
ही घटना गुरुवारी (ता.७) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास केशवनगर मुंढवा येथे घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
याप्रकणी आदित्य दत्तात्रय कांबळे (वय.२२ रा. जांभळे प्लॉट, शिंदे वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सारंग गायकवाड उर्फ साऱ्या (वय. १९) व ऋषीकेश उर्फ भोऱ्या गोवर्धन कांबळे (वय. २३ रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अभय उर्फ धनी व हेमंत गायकवाड उर्फ लाला (वय.२३ दोघे रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गुरुवारी सायंकाळी फिर्यादी हे चिप्स घेण्यासाठी पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी रिक्षातुन आदित्य जवळ आले. त्यांनी आदित्यकडे मोबाईल फोनची मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास नकार दिला. Pune Crime
याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्याकडून मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. आरोपींना विरोध केला असता त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करुन धारदार चाकूने हातावर वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक टापरे करीत आहेत.