Pune Crime : पुण्यात कोयते उगारून पुन्हा एकदा टोळक्यांची दहशद, वाहने फोडून घातला धिंगाणा, कायद्याचा धाक केवळ कागदावरच…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

येरवडा आणि लोहगाव भागात वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना शनिवारी (ता. १७) घडल्या आहेत. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात रिक्षासह इतर वाहनांचे नुकसान केले.
येरवड्यात झालेल्या वाहनांच्या तोडफोड प्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकणी जुगनू राकेश परदेशी (वय ४०, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी चव्हाण आणि परदेशी ओळखीचे आहेत. चव्हाण आणि साथीदार शनिवारी पांडू लमाण वसाहतीत शिरले. त्यांनी शिवीगाळ करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविला.
कोयते उगारून दहशत माजविली. परदेशी यांचा भाचा अनिकेत सोनकरला मारहाण केली. त्यानंतर या भागातील वाहनांची तोडफोड करून टोळके पसार झाले. Pune Crime
लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली. या प्रकरणी करण विजय दोरकर (वय १९, रा. लोहगाव), शाबाद आयुब औटी (वय १८, रा. लोहगाव), तसेच दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकणी अमोल अनंत कानू (वय ३९, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोरकर, औटी आणि अल्पवयीन साथीदार लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आले. त्यांनी ‘झुबेर कोठे राहतो, अशी विचारणा करून शिवीगाळ केली.’ आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. दोन रिक्षांच्या काचांवर दगडफेक केली आहे.