Pune Crime : शिक्षणाचे माहेरघर होतंय गुन्हेगारीचे माहेरघर! आता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केला अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला, घटनेने उडाली खळबळ..

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
तसेच पुण्यात चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. रोज नवीन नवीन प्रकरणं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी बिर्याणी न दिल्यामुळे दुकानदारावर ग्राहकाने चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. आताही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यात शाळकरी मुलांनी एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात घडली. या हल्ल्यात दहावीच्या वर्गातील मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी खडक पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकणी १५ वर्षीय मुलाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलगा महापालिकेच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेली चार मुले याच परिसरात महापालिकेच्या एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकतात. Pune Crime
तक्रारदार मुलाचा दोन दिवसांपूर्वी एकमेकांकडे पाहण्यावरून एका मुलाशी वाद झाला होता. त्या मुलाने शाळेतील मित्रांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी दुपारी तक्रारदार मुलगा रामोशी गेट परिसरातून घरी जात होता.
त्यावेळी चौघांनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ केली. तुला मस्ती आली का? असे म्हणत मुलाला साखळी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. त्याच्या छातीवर चाकूने वार केला. त्यावेळी नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामोशी गेट चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्या मुलावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.