Pune Crime News : गर्लफ्रेंडवर प्रभाव पाडण्यासाठी चोरी केले १५ मोबाईल, पण पोलिसांनी हिसकाच दाखवला अन्…
Pune Crime News पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. तसेच कोण कधी काय करेल हे देखील सांगता येत नाय. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी दोन तरुणांनी पुणे शहरात मोबाईल चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Pune Crime News
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख रुपयांचे १५ मोबाईल जप्त केले असून एक गुन्हा उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई बुधवारी (ता.२५) कात्रज तलाव परिसरात केली आहे.
अर्जुन महादेव शेलार (वय-१८ वर्ष ६ महिने), प्रेम राजु शेलार (वय.२० दोघे रा. मु.पो. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना माहिती मिळाली की, कात्रज तलाव येथे दोनजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आले आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
आरोपींकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे १५ मोबाईल फोन मिळाले. मोबाईल बाबत त्यांच्याकडे केलेल्या चौकशी आरोपींनी मोबाईल कात्रज, गोकुळनगर, कोंढवा भागातून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यामधील एका मोबाईल फोन बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले.
आरोपींकडून २ लाख २ हजार रुपयांचे १५ मोबाईल जप्त केले असून एक गुन्हा उघडकीस आला आहे. तर १४ फोनबाबत तपास सुरु आहे. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी शहरातील विविध भागातून मोबाइल चोरल्याची कबुली दिली.