Pune Crime : सुटे पैसे न दिल्याने प्रवाशावर खुनी हल्ला, रिक्षाचालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

रिक्षा चालकाने प्रवाशासोबत २० रुपयांवरून भांडण केले. मला ओळखले नाही का, मी इथला भाई आहे, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत प्रवाशाच्या डोक्यात दगड मारून प्रवाशाला जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना महाळुंगे येथे मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे.

रिक्षा चालक रोहन शहाजी गायकवाड (२३, रा. चाकण. मूळ रा. जामखेड, जि. अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती बँकेत कामाला जाण्यासाठी रिक्षातून जात होते. ते महाळुंगे कमानीजवळ रिक्षातून उतरले. तिथे रिक्षाचे २० रुपये सुटे न दिल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाने फिर्यादी महिलेच्या पतीसोबत वाद घातला. Pune Crime
तसेच शिवीगाळ केली. ‘मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? मला तुम्ही ओळखत नाही. माझ्याबद्दल तुम्ही माहिती घेतली नाही. मी इथला भाई आहे. तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत रिक्षाचालकाने फिर्यादी महिलेच्या पतीच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार तपास करीत आहेत.
