Pune Crime : भयंकर! लिव्ह इन पार्टनरच्या कृत्याने पुणे हादरलं, हातोडीने ठेचून प्रेयसीला संपवलं, नंतर मुलाला…

Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका लिव्ह इन पार्टनरने त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह हा खंबाटकी घाटात फेकून दिला होता.

तसेच या घटनेत पुन्हा घरात येऊन लिव्ह इन नात्यातून जन्मलेल्या चिमुकल्याला आळंदीत सोडून दिलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लिव्ह इन पार्टनरला अटक केल्यानंतर या घटनेचे बिंग फुटले आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
दिनेश ठोंबरे यांचे आधी एक लग्न झाले होते. त्याला या लग्नापासून दोन मुलं आहेत. तर दिनेशची लिव्ह इन पार्टनर असलेल्या प्रेयसीच देखील पहिलं लग्न झालं आहे. मात्र दोघांचाही संसार फारसा टिकला नव्हता. या दरम्यान या दोघांची भेट झाली होती.

या भेटीचे रूपांतर नंतर मैत्री आणि प्रेमात झाले होते. यानंतर वाकड परिसरात दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्यााचा निर्णय घेतला होता. या नात्यातून त्यांना एक मुलगा देखील झाला होता.
दरम्यान अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर दोघांमध्ये खटके उडायला सुरूवात झाली होती. दिनेश ठोंबरेने सतत प्रेयसीच्या चारीत्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली होती.या संशयातून दोघांमध्ये भांडणास सुरूवात झाली होती.
अशाच एका वादादरम्यान भांडणाने टोकं गाठळं अन् दिनेशने हातोडीच्या सहाय्याने प्रेयसीची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने १३० किलोमीटर दूर जाऊन प्रेयसीचा मृतदेह खंबाटकी घाटात फेकून दिला होता.
प्रेयसीची हत्या केल्यानंतर घरात आल्यावर त्याला लिव्ह इनमधून जन्माला आलेला त्याचा मुलगा देखील दिसला.त्यामुळे त्याने मुलाला आळंदीत सोडून पळ काढला होता.या संपूर्ण घटनेनंतर दिनेशने पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता मुलगा आळंदीत सापडला होता. मात्र दिनेशकडे पोलिसांनी मुलाच्या आईबद्दल चौकशी केली असता, ती देखील बेपत्ता होती.पण आरोपीने ती हरवल्याची कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात दिली नव्हती.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीला प्रेयसी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यास सांगितले. आणि त्याच दिवशी खंबाटकी घाटात एका ट्रक ड्रायव्हरने प्रेयसीचा मृतदेह पाहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी लिव्ह इन पार्टनर दिनेशची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. या प्रकरणी आता आरोपी दिनेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.