Pune Crime : पुण्यात पोलिसांनाच दाखवला कोयता, पाठलाग करून आरोपींना दाखवला हिसका, नेमकं घडलं काय?
Pune Crime : संशयित वाहनाचा पाठलाग करत असताना पोलिसांनाच कोयता दाखवल्याची घटना मुंढवा भागात घडली आहे. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून तपासणी केली असता गाडीत १ हजार १४० लिटर हातभट्टीची गावठी दारू असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विलास बाबासाहेब चव्हाण (४१, रा. काळेपडळ, हडपसर), बापू अशोक जाधव (रा. लोणकर वस्ती, मुंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, मुंढवा पोलिसांच्या वतीने झेड कॉर्नर परिसरात पेट्रोलिंग करण्यात येत होती. त्यावेळी एक चारचाकी वाहन वेगात गेल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना संशय आला. पोलिसांनी खासगी वाहनाने त्याचा पाठलाग केला असता पिकअपच्या चालकाने लोखंडी कोयता दाखवून गाडी अडवायची नाही, असा इशारा केला. Pune Crime
तेव्हा आरोपींना पोलिस असल्याचे सांगताच ते लोखंडी हत्यार जागेवर टाकून पळून जात होते. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला अडवले. यानंतर पोलिसांनी वाहन तपासले असता पिकअपमधील निळ्या ड्रममध्ये हातभट्टीची गावठी दारू असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी २ लाखांची चारचाकी, ३८ कॅनमध्ये असलेली १ लाख २५ हजार ४०० रुपयांची गावठी दारू आणि कोयता असा ३ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.