Pune Crime : भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध प्राशन करून संपवल आयुष्य, पिंपरी चिंचवडमधील घटना..
Pune Crime : भावाच्या छळाला कंटाळून बहिणीने थेट आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहेत. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस ठाणे हद्दीतून समोर आली आहे.
भावाला दिलेले पैसे परत मागितल्याने भावासह त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याच छळाला कंटाळून बहिणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.
सुनीता ऊर्फ नीता रामेश्वर राठोड (वय.३१ वर्ष, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी (दोघे रा. ताथवडे) विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहिती नुसार, सुनिता आणि रामेश्वर यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. दोघेही मजुरीचे काम करत होते. दरम्यान, सुनीता यांनी आपला भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते.
मात्र, दिलेल्या मुदतीत भावाने पैसे दिले नसल्याने ते पैसे परत मागण्यासाठी 3 डिसेंबर रोजी सुनिता या भावाच्या घरी गेल्या होत्या. मात्र, पैसे न देता भावाच्या पत्नीने त्यांना शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले.
भावाच्या पत्नीने मारहाण केल्यावर त्याच दिवशी रात्री उशिरा पुन्हा सुनिता यांच्या भावाच्या पत्नीने सुनीता यांना त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली. या प्रकरणी ४ डिसेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ डिसेंबर रोजी सुनीता एका सोसायटीमध्ये घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या.
काम करून घरी परत येत असताना त्यांना भाऊ संदीप आणि त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून पुन्हा बेदम मारहाण करून जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. याबाबत पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान भावाच्या याच छळाला कंटाळून सुनिता यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचे पती रामेश्वर यांनी पोलिसांत दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच ५ डिसेंबरला भावाने आणि त्याच्या पतीने मारहाण केल्यावर, ६ डिसेंबर रोजी सुनीता सकाळी दहा वाजता ताथवडे येथे बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यामुळे, याप्रकरणी सुनीता यांचे पती रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा भाऊ संदीप शा त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.