Pune Crime : पुणे हादरले! घरात घुसून विनयभंग अन् अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल, आरोपीला बेड्या..

Pune Crime पुणे : रोड रोमिओने चक्क घरात शिरून तिचा विनयभंग केल्याने त्याच्या सततच्या जाचाला कंटाळून १५ वर्षाच्या मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (ता. १२) सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे. (Pune Crime)

त्रिशला बंडु कवडे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई आशा कवडे (रा. मोझे आळी, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोमनाथ ऊर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (वय २२, रा. मोझे आळी, लोहगाव) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी एकाच गल्लीत राहतात. फिर्यादीची मुलगी त्रिशला ही आठ दिवसांपूर्वी क्लासला जात असताना सोमनाथ राखपसरे याने रिक्षा तिच्याजवळ थांबवून बस अॅटोत, मी सोडवतो, असे म्हणून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर मंगळवारी (ता. १२) सायंकाळी सोमनाथ त्यांच्या घरात शिरला. फिर्यादी यांची मुलगी हॉलमधील सोफ्यावर बसली होती. सोमनाथ तिच्या शेजारी बसून तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न करत असताना मुलगी पलीकडे सरकली. त्याचवेळी फिर्यादी घरात आल्या.
त्यांना पाहून सोमनाथ फिर्यादी यांना धक्का देऊन पळून गेला. फिर्यादी या त्याला पकडण्यासाठी त्याच्यामागे धावत गेल्या. इकडे मुलीने दरवाजा बंद करुन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान पोलिसांनी विनयभंग, पोक्सो व आत्महत्येस जबाबदार धरुन सोमनाथवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.