Pune Crime : पुण्यात दांडिया खेळायला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले, नेमकं काय घडलं?

Pune Crime पुणे : एकीकडे देशभरासह राज्यात नवरात्रीची धूम सुरु असून ,अशातच कात्रज भागात एका किराणा माल विक्रेत्याने खंडणी न दिल्याने दुकानाची तोडफोड करुन पसार झालेला आरोपी दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले. Pune Crime
विनोद बालाजी सोमवंशी (वय २०, रा. दत्तनगर, कात्रज), गोविंद बबन लोखंडे (वय १८, रा. शनीनगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, विनोद सोमवंशीने साथीदार भूषण भांडवलकर, जावेद शेख यांना एका किराणा माल दुकानदाराकडून खंडणी घेण्यास सांगितले होते. किराणा माल विक्रेत्याने खंडणी देण्यास नकार दिल्याने सोमवंशी चिडला.
त्यानंतर सोमवंशी आणि साथीदार किराणा माल दुकानात शिरले. दुकानाची तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी दिली. किराणा माल विक्रेत्याचा पुतण्या आणि मेहुण्याला मारहाण केली.
या भागातील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली.घाबरलेल्या दुकानदाराने भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या सोमवंशी आणि साथीदारांचा शोध सुरू केला.
दरम्यान, सोमवंशी आणि साथीदार लोखंडे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नवरात्रोत्सवात दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना मिळाली. सापळा लावून दोघांना पोलिसांनी पकडले आहे.