Pune Crime : शिवजयंती मिरवणुकीत वाद, तरुणावर चाकुने वार, विश्रामबाग पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा…
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
शिवजयंती मिरवणुकीत झालेल्या वादातून तीन जणांनी एका तरुणावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (ता.२८) रात्री दहाच्या सुमारास एस पी कॉलेजच्या रमाबाई हॉलच्या मागील बाथरूम जवळ घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वैजनाथ रामदास कांबळे (वय.२४) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अनिकेत राजु कांबळे (वय.२५ रा. विद्या हेरिटेज समोर, आझादनगर, वानवडी) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार आदित्य अजित तोरसकर (वय.२०रा. व्यंकटेश क्लासीक, हांडेवाडी, हडपसर) व त्याच्या इतर दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार फिर्य़ादी आरोपी यांचे शिवजयंतीच्या मिरवणुकीत किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्य़ादी व त्याचा मित्र शिवजयंती मिरवणुक संपल्यानंतर एस.पी. कॉलेजच्या रमाबाई हॉलच्या मागे हातपाय धुण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. मिरवणुकीत झालेल्या वादाच्या कारणावरुन अनिकेत याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या वैजनाथ कांबळे याच्यावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करीत आहेत.