Pune Crime : गार वडापाव दिल्याचा आला राग, स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना..

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाष्टा करण्यासाठी गेलेल्या दोन जणांनी थंड वडापाव दिल्याच्या रागातून दुकान चालकास जबर मारहाण केली. काचेची बरणी फेकून स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना पुण्यातील बालेवाडी परिसरातून समोर आली आहे.
यात सदर इसम जखमी झाला असून या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पुणे शहरातील बालेवाडी भागात शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता अंकुश कोंडीबा ढेबे व त्याचा एक मित्र स्नॅक्स सेंटरवर आले होते.

त्यांनी स्नॅक्स सेंटर चालक प्रकाशचंद्र जोशी यांच्याकडे वडापावची ऑर्डर दिली. वडापाव मिळताच तो गार आहे, असे आरोपींनी त्यांना सांगितले आहे. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. यानंतर ढेबे व त्याच्या मित्राने जोशी याना मारहाण करण्यास सुरवात केली आहे. Pune Crime
दरम्यान, दोघांनी दुकानातील चहाचा थर्मास खाली फेकून दिला. तर ढेबे याने काऊंटरवरील काचेची बरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. या घटनेत जोशींच्या डोक्याला व हाताला मार लागला. मारहाण केल्यानंतर त्या दोघांनी तिथून पळ काढला.
सदर प्रकरणानंतर प्रकाशचंद्र जोशी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुशृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अंकुश कोंडीबा ढेबे या तरुणासह त्याच्या एका मित्रावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.