Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? कारचा धक्का लागल्याच्या वादातून तरूणाची हत्या, हडपसर परिसरातील घटना..

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
केवळ कारचा धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना फुरसुंगी ते चंदवाडी रोड रस्त्यावर मंगळवारी (ता.१२) घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime
अभिषेक संजय भोसले (वय ३० रा -शेवाळवाडी, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (रा. चंदवाडी, फुरसुंगी) व इतर ७-८ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकणी मयत भोसले यांचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय.१८ रा – २०९, ऑर्चीड रिसिडेन्सी शेवाळवाडी ता -हवेली पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन सकट याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचा मामा अभिषेक भोसले यांची स्विफ्ट गाडी घासल्याच्या कारणावरून आरोपी विलास सकट याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. याच वादाच्या कारणावरुन आरोपील विलास सकट, कैलास सकट, सचिन सकट व इतर ७-८ इसमानी संगनमत करून शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, त्यानंतर लोखंडी धारदार शस्त्राने व दगडाने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने जबर मारहाण करून त्याला जीवे ठार मारले. तसेच फिर्यादी अडवायला गेला असता त्याला सुद्धा दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.