Pune Crime : अनैतिक संबंधातुन तरुणाचा डोक्यात दगड घालून खून, बाणेरमध्ये भयंकर घटना, गुन्हे शाखेने आरोपीला ठोकल्या बेड्या…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोज अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे शहरातील बाणेर भागातील धनकुडे वस्ती येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना धनगुडे वस्ती येथे रविवारी (ता.९) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली होती.
घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून अटक केली आहे. अनैतिक संबंधातून आरोपीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नाना विठ्ठल चादर (वय.३६ रा. वाकड गावठाण वाकड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा भीमराव सुरोसे (वय.४० रा. बालेवाडी गावठाण मुळ रा. आनंदवाडी, ता. परतूर, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, आरोपी कृष्णा आणि मयत नाना हे एकमेकांचे मित्र होते. कृष्णा अंबरनाथ परिसरात कुटुंबासोबत राहत होता. २०१६ मध्ये तो बालेवाडी परिसरात राहण्यास आला. बालेवाडीत आल्यानंतर त्याची ओळख नाना चादर याच्यासोबत झाली. आरोपीच्या नात्यातील एका महिलेसोबत नाना चादर याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे आरोपी नाना याच्यावर चिडून होता. Pune Crime
कृष्णा आणि मयत नाना चादर यांना दारु पिण्याचे व्यसन होते. ७ जून रोजी रात्री चादर आणि त्याचा मित्र रामदास धनगुडे यांनी मोकळ्या जागेत दारु प्याली. दारुच्या नशेत नाना त्याच ठिकाणी झोपी गेला. धनगुडे तेथून निघून गेला.
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी कृष्णा याला गांजा ओढण्याची तलफ झाली. त्यामुळे तो गांजा ओढण्यासाठी मोकळ्या जागेत आला. त्यावेळी त्याने नाना चादर दारुच्या नशेत झोपल्याचे पाहिले. चादर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करुन कृष्णा पसार झाला.
गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तांत्रिक तपास करुन आरोपी कृष्णा सुरोशे याला अंबरनात परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नाना चादर याचे नात्यातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आरोपीने सांगितले.