Pune Crime : धक्कादायक! पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे न घेतल्याने पत्रकारावर कोयत्याने वार, पुण्यातील घटना..
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोज अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. पोलिसांत दिलेली तक्रार मागे न घेतल्याने तिघा जणांनी पत्रकारावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकणी राहुल अशोक बानगुडे (वय. ४०, रा. भालेकर चाळ, एरंडवणा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यश राजेश कंधारे (वय. २२, रा. रतनदीप सोसायटी, पटवर्धन बागेजवळ, एरंडवणा), ओम राजेश कंधारे (वय.१८) आणि राजेश विठ्ठल कंधारे (वय ५०, रा. एरंडवणा) या तिघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे भालेकर वस्ती येथील गणेश मंदिराजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता फोनवर बोलत थांबले होते. त्यावेळी तेथे यश कंधारे आला. त्याने तू आमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेत नाही़ तुम्हाला मस्ती आली आहे काय, तुम्हाला राहायचे आहे की नाही, असे म्हणून तू पोलिसांत तक्रार करतो का माजला काय आमच्या नादी लागतो का असे म्हणून त्याने कोयता काढून फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा फिर्यादीने हातमध्ये घातला असता कोयता डाव्या हाताला लागला. त्याचवेळी तेथे शंभु कंधारे, राजेश कंधारे गाडीवरुन आले. त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी, हाताने, काठीने, दगडाने मारहाण केली. Pune Crime
फिर्यादी जखमी अवस्थेत तेथून पळून जाऊ लागले. तेव्हा राजेश याने गाडीवरुन पाठीमागून येऊन पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत पोलीस चौकीत गेलात तर तुला चैन चोरीचा खोटा गुन्हा दाखल करुन त्यात अडकवू असे म्हणून धमकी दिली आहे. डेक्कन पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक राऊत तपास करीत आहेत.