Pune Crime : कोथरूड पुन्हा हादरलं! गुंड टोळक्याने एकाचा पाठलाग करून कोयत्याने वार करत केला खून…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंड टोळक्याने तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री घडली.

या प्रकरणी गुन्हे शाखेने अल्पवयीन मुलासह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर अन्य एकाला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

श्रीनु शंकर विसलावत (वय. २२, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाने (वय १७, रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) फिर्याद दिली आहे. त्यावरून अलंकार पोलिस ठाण्यात सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण दत्ता कदम (वय. २२), अजय ऊर्फ सचिन जाधव (वय. १८), रोहन कल्याण अडागळे (वय. १८, तिघे रा. वडारवस्ती, कर्वेनगर), अथर्व लक्ष्मण शेळके (वय. २०, रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) या संशयितांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

तसेच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, श्रीहरी बहिरट यांच्या पथकाने ही कारवाई केली. तर, अलंकार पोलिसांनी प्रकाश अनंतकर (रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावरून १६ जून ते १७ जूनच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. फिर्यादी आणि श्रीनु हे दोघे रात्री डहाणूकर कॉलनीतील एका केकच्या दुकानासमोर थांबले होते. Pune Crime

त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील दुचाकीने फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केला. परंतु फिर्यादी तो वार चुकवून घराच्या दिशेने पळाला. त्यानंतर आरोपींनी श्रीनुचा पाठलाग करून त्याच्या मानेवर कोयत्याने वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने श्रीनुचा मृत्यू झाला. पुढील तपास परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!