पुणे शहरातील अट्टल महिला गुन्हेगारावर एमपीडीएची स्थानबध्दतेची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून ३९ वी कारवाई
पुणे : हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारुचे गुन्हे करणाऱ्या अट्टल महिला गन्हेगाराविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी केली आहे. तसेच पोलिस आयुक्तांची ही ३९ वी कारवाई केली आहे.
सुमन संजय कडमंची (वय. ४१ रा. समर्थनगर, हिंगणे मळा, हडपसर) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी ही अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तीने तिच्या साथीदरांसह बेकायदेशीर भेसळयुक्त ताडी विक्री करण्यायासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तिच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.
तसेच तिच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. आरोपी सुमन कडमंची हिच्या विरोधात मागील 5 वर्षात 8 गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी सुमन कडमंची हिला नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके , पी.सी.बी. गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक राजु बहिरट यांनी केली.
दरम्यान, पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल ३९ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.