‘पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्यापेक्षा या ठिकाणी टीपी स्किम राबवावी’…!

पुणे : कॅन्टोन्मेंट हे सैन्य दलाच्या कामकाज आणि सैन्य दलातील अधिकारी व कर्मचार्यांच्या वास्तव्यासाठी स्थापित केलेली वस्ती आहे. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा तसा फारसा संबंध येत नाही. परंतु गेल्या काही वर्षांत नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे.
पुणे कॅन्टोमेंन्टची लोकसंख्या वाढली असून, उपलब्ध सोयीसुविधा अपुर्या पडत आहेत. दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेमध्ये समाविष्ट केल्यास हा निर्णय चुकीचा ठरेल. एकेकाळी कॅन्टोन्मेंट बोर्ड हे शहराच्या बाहेर होते.
परंतु वाढत्या नागरीकरणामुळे ते आता शहराचा मध्यवर्ती भाग बनले आहे. बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्यापेक्षा या ठिकाणी टीपी स्किम राबवावी, असे मत निवृत्त नगर नियोजनकार रामचंद्र गोहाड यांनी व्यक्त केले आहे.
बोर्डाने उंच इमारतींना परवानगी देणे बंद केले. त्यामुळे आज सध्या असलेल्या बांधकाम क्षेत्राइतकेच बांधकाम करण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे बांधकामासाठी मर्यादा येतात.
पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये बंगले मोठ्या प्रमाणात असून, ते एकत्र करून दहा एकर क्षेत्राच्या पुढील क्षेत्रात नगर रचना योजना राबविता येते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट महापालिकेत समाविष्ट करण्यापेक्षा त्याठिकाणी टीपी स्किम राबविल्यास कॅन्टोन्मेंटचे वैभव कायम राहील, असेही म्हटले जात आहे.