Pune : बोपदेव घाटातील सामुहिक अत्याचार प्रकरणी मोठी माहिती समोर, अखेर आरोपींची ओळख पटली; एकाला अटक…

Pune : बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी ३ संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. एका आरोपीला गुन्हे शाखेने जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे.
तर अन्य दोघांना नागपूरमध्ये ताब्यात घेतले आहे. सायंकाळपर्यंत या आरोपींना पुण्यात आणले जाईल अशी चर्चा आहे. येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना ३ संशयित तरुण सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहेत.
या सीसीटिव्हीद्वारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दुपारपर्यंत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आणखी मोठी एक अपडेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या ६० टीम पोलिसांनी तयार केल्या आहेत. 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट फिरत असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आल आहे. आतापर्यंत रेकॉर्डवरील ४०० गुन्हेगारांची झाडझडती केली आहे.
नेमकं काय घडलं?
बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या २१ वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ४ ऑक्टोबरला घडली. पीडित तरुणी आणि मुलगा एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात दुचाकीवरुन फिरायला गेले होते.
त्यावेळी घाटात गप्पा मारत थांबले असता दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून घाटात असलेल्या पठारावर घेऊन गेले. यावेळी तरुणीच्या मित्राला बेल्ट आणि कपड्यांनी बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर मित्रासमोरच तिघांनी तरुणीवर बलात्कार केला आणि तिघे जण पसार झाले.
या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यात पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र आता वेगात फिरवण्यास सुरुवात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी या आधीच पुणे पोलिसांनी ५० हजार मोबाइल डेटा स्कॅन केला आहे.