Pune : काळजी घ्या! पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, नव्या लक्षणांमुळे वाढली चिंता..

Pune : शहरात सध्या ऑक्टोबर हीटमुळे उकाडा वाढला आहे. त्यातच ढगाळ वातावरण असून, पाऊसही पडत आहे. या खराब हवामानामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विषाणूजन्य संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे.
तसेच पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरामध्ये गेल्या महिनाभरात डेंग्यूचे ४९२ संशयित रुग्ण आणि चिकनगुनियाच्या २६१ रुग्णांची नोंद झाली आहे. चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये काही वेगळी लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार, पुणे शहरामध्ये ६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या एक महिन्याच्या काळात डेंग्यूचे ४९२ संशयित रुग्ण आढळले. यापैकी ३० रुग्णांना डेंग्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात डेंग्यूचे ४ हजार ५६ संशयित रुग्ण सापडले आहेत. Pune
चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ ही सध्या महापालिकेसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. कारण रुग्णांमध्ये अधिक तीव्र आणि वेगळी लक्षणं दिसायला लागली आहेत. सुरुवातीला सांधेदुखी आणि ताप ही लक्षणे रुग्णांमध्ये दिसून यायची. आता मेंदूज्वर आणि ह्रदयाच्या आवरणावर सूज ही लक्षणे दिसत आहेत.
डेंग्यू आणि चिकनगुनियापासून संरक्षणासाठी हे करा…
आपल्या आजुबाजूचा परिसर कोरडा आणि स्वच्छ ठेवत जा.
घरामध्ये मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक औषधे वापरा.
नेहमी उकळलेले पाणी थंड करुन प्या.
घराचे छत, गॅलरी, आणि इतर ठिकाणी निरुपयोगी सामान साठवून ठेवू नका.
भांड्यांमध्ये पाणी भरुन ठेवलेले असल्यास ते झाकून ठेवा. घराच्या आजुबाजूला पाणी साठलेले नाही, याची खात्री करा.
आठवड्यातून एकदा पाणी साठवून ठेवलेल्या टाक्या किंवा कंटेनर रिकामे करुन साफ करा आणि पुन्हा पाणी भरा.
फळे आणि भाज्या स्वच्छ धुवा आणि मगच खा.
रस्त्यावरचे उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका.
नेहमी संपूर्ण शरीर झाकण्याचा प्रयत्न करा.
आरोग्याशी निगडित कोणताही त्रास होत असल्याल डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.