Pune : आता पुणेही घेणार आकाशात भरारी! गगनचुंबी इमारतीच्या १९ प्रकल्पांना मान्यता…


Pune पुणे : मुंबईप्रमाणेच पुणे शहराच्या उपनगरांतही आता गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. आत्तापर्यंत १०० मीटर उंचीपेक्षा जास्त १९ प्रकल्पांना महापालिकेने मंजुरी दिली आहे. प्रथमच महापालिकेकडून १६० मीटर म्हणजेच ४० मजली इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

ही इमारत बोपोडीमध्ये उभी राहणार आहे, तर आत्तापर्यंत बाणेर, बालेवाडी, खराडी, वडगाव शेरी या भागात सर्वाधिक उंचीच्या इमारतींना बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.

शहराची लोकसंख्या वाढत असताना राज्य सरकारने वेळोवेळी हद्दवाढ केलेली आहे. यामध्ये १९९७ मध्ये २३ गावे घेतली, त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये २०२१ पर्यंत ३५ गावांचा समावेश शहरात करण्यात आला.

हद्दवाढ होत असताना या उपनगरांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी अनेक मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे कामही हाती घेतले आहे. शहरात खराडी, वडगाव शेरी, बाणेर, बालेवाडी या भागांत आयटी कंपन्यांची संख्या जास्त असल्यानेच याच भागात सर्वाधिक सदनिका घेण्याचेही प्रमाण जास्त आहे. Pune

रस्ता रुंदी आणि भूखंडाचे क्षेत्रफळ विचारात घेऊन ७० मीटरपेक्षा जास्त उंच इमारत बांधण्यासाठी काही अटींवर परवानगी देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून प्रस्तावांची छाननी करून प्रकल्पांना मान्यता दिली जात होती.

मध्यंतरी हे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायराइज कमिटीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत बोपोडीतील उंच म्हणजे १६० मीटर उंचीच्या ४० मजली इमारतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

संगमवाडी, बिबवेवाडी, औंध, येरवडा आदी भागांत यापूर्वी १०० मीटरच्या आतील बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवार आणि सोमवार पेठेत प्रत्येकी ८२.५ मीटर आणि १०४ मीटरच्या उंचीच्या इमारतींना परवानगी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!