Pune Accident : संपूर्ण अग्रवाल कुटुंब अटकेत! पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही बेड्या…

Pune Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती.

या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. आता या प्रकरणात पोलिसांनी या मुलाच्या आईला अटक केली आहे. Pune Accident
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या आईला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉय आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी आरोपीच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने चक्क खासगी व्यक्तींकडून अदलाबदल करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. तसंच ते नमुने अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याचंही सांगितलं जातं होतं. याचाच सविस्तर तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक केली.