Pune Accident : अग्रवालाच्या पोराला लगेचच तत्परतेने जामीन मिळालाच कसा? आता ‘त्या’ सदस्यांचीही होणार चौकशी..
Pune Accident : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. बेदरकारपणे आपल्या बापाच्या महागड्या कारनं दोघांना चिरडणारा धनिकपुत्र आणि अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचे धक्कादायक वास्तवही या प्रकरणात समोर आले आहे.
याप्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असतात. हिट अँड रन प्रकरणात आरोपीला अवघ्या पंधरा तासात जामीन देण्यात आल्यानंतर बाल न्याय मंडळाचा निर्णय वादात सापडला होता. मुळात पोलिसांच्या कार्यपद्धतीपेक्षा ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर या पोराची सुटका केली गेल्यानंतरच पुण्यासह राज्यात चर्चा झाली होती आणि त्यानंतरच हे प्रकरण जास्त तापले
त्यामुळे आता या निर्णयाविरुद्ध महिला व बालविकास विभागाने चौकशी समिती नेमली असून या चौकशीमुळे संबंधित सदस्यावर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
दरम्यान या चौकशीत प्रथमदर्शनी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनंतर आता बाल न्याय मंडळाचा देखील नंबर लागणार का? अशीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
आता या चौकशी समितीच्या चौकशीनुसार बाल न्याय मंडळाने दिलेल्या निकालाची समीक्षा केली जाणार असून, विभागाने नियुक्त केलेल्या सदस्याच्या निकालाची वस्तुस्थिती देखील तपासली जाणार आहे. Pune Accident
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाल न्याय मंडळाच्या प्रमुख दंडाधिकाऱ्याच्या गैरहजेरीत दिलेल्या या निकालाची तपासणी केली जाणार आहे. या प्रकरणात काही गैरव्यवहार झाला का? याची देखील तपासणी केली जाणार आहे. 19 मे रोजी चे बाल न्याय मंडळातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाणार आहे असे देखील सांगितले जात आहे. या माध्यमातून नेमके या ठिकाणी कोण कोण आले आणि त्यांचा कोणा कोणाशी संपर्क झाला हे देखील तपासले जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, १९ मे रोजी रविवारची सुट्टी असतानाही डॉ. दानवडे यांनी एवढी तत्परता का दाखवली? त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू औद्योगिक शाळा आणि निरीक्षणगृहाचे अधीक्षक दत्तात्रय कुठे यांना बोलावून घेतले, मात्र प्रमुख दंडाधिकारी मानसी परदेशी यांची परवानगी घेतली होती का आणि दुसरे सदस्य केटी थोरात यांना का बोलावले नाही? याची देखील चौकशी केली जाणार आहे. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.