Pune : पुण्यात बड्या बांधकाम व्यावसायिकाने संपवलं आयुष्य, मुलांवर गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?
Pune : पुण्यात गृहनिर्मिती प्रकल्पातील आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भागीदारासह त्याच्या दोन मुलांविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
किशोर मनोहर बेट्टीगिरी (वय ५२, रा. पद्मनाभ बंगला, रायकरनगर, धायरी) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सविता किशोर बेट्टीगिरी (वय ४८) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, पोलिसांनी भागीदार सुरेंद्र बाबुराव लायगुडे, संग्राम सुरेंद्र लायगुडे, सागर सुरेंद्र लायगुडे (तिघे रा. धायरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेट्टीगिरी कुटुंबीय हे मुळचे कर्नाटकातील आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते धायरीमध्ये स्थायिक झाले आहेत. बेट्टीगिरी आणि सुरेंद्र लायगुडे यांनी भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय सुरु केला. धायरीतील बारंगिणी मळा येथे राजवीर अव्हेन्यू गृहप्रकल्पाचे काम सुरु केले होते. स्वाती कन्सलटन्सीकडून संग्राम लायगुडे व त्याचा भाऊ सागर लायगुडे यांनी बेट्टीगिरी यांना ९१ लाख रुपये दिले होते.
बेट्टीगिरी यांनी ८० लाख रुपये परत केले होते. त्यानंतर उर्वरित पैशांसाठी त्यांनी तगादा लावून दोन ते तीन वेळा काम बंद पाडले होते. तसेच त्यांनी गृहप्रकल्पातील दोन व्यावसायिक गाळे ताब्यात घेतले होते. त्याबाबत विचारणा करण्यासाठी सुरेंद्र लायगुडे यांच्याकडे गेले होते.
त्यावेळी त्यांनी माझी पोरे तुला हिशोब मागणार तो तुला द्यावाच लागेल,असे बोलून जमत नसेल तर जा जीव दे जा, असे बोलले. हे गाळे भाड्याने देऊन त्याबाबत नोटीस पाठवून बेट्टीगिरी यांच्या वर दबाव टाकला.
त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले. बेट्टीगिरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. बेट्टीगिरी यांच्यावरील धार्मिक कार्य पूर्ण केल्यानंतर आता फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तपास करीत आहेत.