हडपसर-यवत सहा पदरी उड्डाणपुलासाठी ५,२६२ कोटींची तरतूद; अर्थसंकल्पात निधी मंजुरीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा…


उरुळीकांचन: पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यान होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दौंड तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात या सहा पदरी उड्डाणपुलासाठी ५ हजार २६२ कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद जाहीर केली आहे. या निर्णयामुळे दौंड तालुक्याच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाचे नवे दालन उघडले जाणार आहे.

पुणे शहरातून दौंड तालुक्यात प्रवेश करण्यासाठी हडपसर-यवत हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे या मार्गावर तासनतास वाहतूक कोंडी होत असते. प्रस्तावित सहा पदरी उड्डाणपुलामुळे पुणेकरांना आणि दौंडमधील नागरिकांना विनाअडथळा आणि जलदगतीने प्रवास करता येणार आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे यवत, केडगाव, भांडगाव, खोर, वरवंड आणि पाटस या भागांमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा वाढणार आहे. पुण्याच्या विस्तारणाऱ्या सीमांमुळे या परिसरात नवीन कारखाने आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, महामार्गालगत वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्राचा मोठा विकास होईल, कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विकासकांचे लक्ष या भागाकडे वेधले जाईल.

दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील खोर, भांडगाव, वासुंदे, जिरेगाव या जिरायती पट्ट्याला आगामी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. महामार्ग, उड्डाणपूल आणि नियोजित विमानतळ या तिन्ही गोष्टींमुळे या परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, हा प्रकल्प दौंडसाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार आहे.

आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निधी मंजूर झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे दौंड तालुक्याचे अर्थकारण बदलणार असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी भावना व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षभरापासून मी या सहा पदरी उड्डाणपुलासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. आजच्या अर्थसंकल्पात ५,२६२ कोटी रुपयांची तरतूद झाल्याने पुण्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. दौंडच्या जनतेच्या वतीने मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.

– राहुल कुल, आमदार, दौंड

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!