चंदननगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; एका महिलेला अटक, गुन्हे शाखेची कारवाई..
पुणे : पुण्यातील चंदननगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत काहींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून मसाज सेंटरचा मालकासह व्यवस्थापकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटना सध्या अनेक ठिकाणी उघडकीस येत आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, चंदननगर भागातील डेला थाई नावाच्या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
दरम्यान, पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांच्या पथकाने कारवाई करुन एका महिलेला ताब्यात घेतले. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनिमयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अजय राणे, इरफान पठाण, मनीषा पुकाळे, रेश्मा कंक, ओंकार कुंभार आदींनी केली.