थेऊर – नायगाव- उरुळी कांचन रस्त्याला लागली ५ वर्षे ; प्रतिदीन ५ हजार रुपये ठेकेदाराला दंडाचा प्रस्ताव अधिक्षक अभियंत्याकडे…!
उरुळी कांचन : थेऊर- नायगाव- उरुळी कांचन रस्त्याच्या कामाला दिरंगाई करणाऱ्या मोतीलाल धुत इन्फास्ट्रक्चर कंपनीला प्रतिदिन ५ हजार रुपये विलंब भरपाई आकारणीचा प्रस्ताव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर केला आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक तीन मधील महादेव कांचन कॉलेज ते बायफ संस्थेच्या गेट पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण कामासंदर्भात गेल्या चार महिन्यांपासून उरुळी कांचन येथील भाजपचे पदाधिकारी पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजय भोसले यांना या कामासंदर्भात सोमवारी (ता. ६) माहिती विचारली असता यावेळी भोसले यांनी ही माहिती दिली आहे.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा पुजा सणस, हवेली तालुका झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, उरुळी कांचन शहर भाजप शहराध्यक्ष अमित कांचन, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष गणेश घाडगे, मानसी भुजबळ व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
सीएसआर फंडातून थेऊर-नायगाव-उरुळीकांचन या रस्त्याची २०१८ साली पुर्ण टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. हे काम मोतीलाल धुत इन्फास्ट्रक्चर प्रा. लि या कंपनीला मिळाले होते. कंपनीने या रस्त्याचे काम सन २०१९ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, सदर ठेकेदाराने काम संथगतीने सुरू केले, त्यामुळे त्याला पैसे उशिरा मिळाले. आता उशिरा कामामुळे जानेवारी २०२३ पासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, तसेच सर्व रस्त्याचे काम मार्च २०२३ अखेर पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.
दरम्यान, अद्यापपर्यंत सदरचे काम पूर्ण करण्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आल्याचे ठेकेदाराकडून दिसून आलेले नाही किंवा त्याने यासंदर्भात विभागास कळविलेले नाही. ठेकेदारास यापूर्वीही काम पूर्ण करण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ठेकदार यांनी प्रत्यक्ष काम सुरु केलेले नसल्याने प्रतिदिन ५ हजार रुपये विलंब भरपाई आकारणी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर सादर केला आहे. प्रस्तावासंदर्भात निर्णय आल्यानंतर त्वरित पुढील कारवाई करण्यात येईल, असे अजय भोसले यांनी सांगितले आहे.
याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले म्हणाले कि, उरुळी कांचन येथील भाजपचे पदाधिकारी या रस्त्याच्या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा करीत आहे. नागरिकांनी उर्वरित डांबरीकरणाचे काम त्वरित सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम सुरु करण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे.