घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज केला लंपास, हवेली तालुक्यात घडली घटना..

लोणी काळभोर : घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडेचार लाखांचा किमती ऐवज चोरून नेला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात घडली आहे.

याप्रकरणी सुनिल लक्ष्मण कानकाटे (वय ५८, मुळ रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मुऴ, ता. हवेली, सध्या रा. आदित्य नगर, हडपसर, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल कानकाटे हे हडपसर परिसरात राहतात. तर त्यांच्या आई या कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदारवस्ती परिसरात राहतात. त्यांच्या आई सुभद्रा लक्ष्मण कानकाटे या आजारी असल्याने त्यांना दोन दिवस रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना रुग्णालयातून घरी आणले, यावेळी त्यांच्या बंद राहते घराचे कुलुप कोणातरी अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने तोडल्याचे दिसून आले.
त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील ५० हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्याची पोत, सोन्याची अंगठी, कानातील कर्नफुले असे चार लाखांचे दागिने आढळून आले नाहीत. यावरून घरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. यांमुळे साडे चार लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.
