४७ हजार २९७ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला तसेच तंबाखूजन्य पदार्थ जप्त; दोघांना अटक.

लोणी काळभोर : प्रतिबंधित गुटखा व पानमसाला तसेच तंबाखूजन्य पदार्थाचा साठा करून विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ४७ हजार २९७ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (२७ फेब्रुवारी) रोजी लोणी काळभोर गावातील पवार पान शॉप (पवार हाईट्स, खोकलाई देवी चौक) या दुकानात बेकायदेशीर प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा असल्याबाबत व त्याची लोकांना विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी खब-यामार्फत मिळाली होती. याची खातरजमा करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर व अन्न सुरक्षा विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारांस वरील ठिकाणी छापा घातला.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले एकुण किंमत ४७ हजार २९७ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला तसेच तंबाखुजन्य पदार्थाचा साठा मिळून आला.तो जप्त करुन त्याची विक्री व साठा करणारे गणेश बाळू भंडलकर व निलेश वसंत पवार (दोन्ही रा.लोणी गाव) यांचे विरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अनुराधा उदमले, लोणी काळभोर विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस हवालदार वनय, पोलीस शिपाई पाटील तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी बा. औ. शिंदे गुप्त वार्ता व सुप्रिया जगताप यांनी केली आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत वेळोवेळी केलेल्या अवैध धंद्यावरील कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दीष्ठ असल्याची भावना पोलीस विभागाकडुन याप्रसंगी व्यक्त करण्यात आली आहे.