पूर्व हवेलीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जनतेला लाभ नाहीच ! डेंग्यू, चिकुणगुण्या साथीत गरीब भरडले ! दौंडमध्ये लाभ तर हवेलीत ठेंगा …..
उरुळीकांचन : पूर्व हवेली तालुक्यात गेली दिड महिने सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाल्याने डेंग्यू ,चिकुणगुण्या व मलेरिया आजार चांगलाच फोफावला आहे. तालुक्यातील अनेक छोटी -मोठी हॉस्पिटल डेंग्यू व चिकुणगुण्या सारख्या आजरांनी भरली जात आहे.या आजाराचे रुग्ण गावोगावी सापडत असल्याने आजाराची व्याप्ती दिवसागणिज वाढत आहे. या आजाराचा उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये रांग लागली असताना या आजारांचा खर्च करण्यासाठी हजारो रुपये खर्च होऊन गरीबांचे खिसे रिकामे होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणूस या संसर्गजन्य आजारांनी पिळला जात असताना पूर्व हवेली तालुक्यातील मुख्यहॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनाच कार्यान्वीत नसल्याने या योजनेअभावी गोरगरीब नागरीकांचे कंबरडे मोडले असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
राज्य शासनाने अर्थिकदृष्या गरीब असलेल्या रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अंतोद्य कार्ड,अन्न सुरक्षा कार्ड व पिवळे रेशनकार्ड असणाऱ्या उत्पन्न गटातील नागरीकांना उपचारासाठी ही योजना सुरू केली आहे. योजनेचा मुख्य उद्देश गरीब लोकांचा मोफत उपचार म्हणून व्हावा असला तरी या योजनेत केंद्राच्या एनएबीएच प्रमाणपत्र असलेल्या खाजगी दवाखान्यांना ही य़ोजना राबविण्यासाठी नोंदीकृत केले आहे. मात्र पूर्व हवेलीत मोठ्या गावांत अनेक हॉस्पिटलमध्ये एनएबीएच हे प्रमाणपत्र असून शासन स्तरावर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नोंंदीकृत न केल्याने पर्यायाने गोरगरिबांना मोफत उपचार मिळत नसल्याने डेंग्यू,चिकणगुण्या व मलेरिया सारख्या आजारांनी गरीबांची पिळवणूक वाढली आहे.
केंद्र सरकारचे एनएबीएच प्रमाणपत्र असलेल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या ९७१ प्रकारचे रोगांवर या योजनेतून उपचार होत आहे. अगदी योजनेची नोंदणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये हदयशस्त्रक्रीया, कर्करोग,हाडांचे दुखणे तसेच संसंर्ग जन्य आजारांवर अल्प उत्पन्न असलेल्या नागरीकांचे मोफत उपचार होत असताना पूर्व हवेलीत हॉस्पिटलमध्ये नोंदणी नसल्याने रुग्णांना सुविधेस मुकावे लागत असूनगोरगरीब रुग्णांची अर्थिक लूट या योजना राबविण्याचा हलगर्जीपणा झाल्याने होत आहे.
पुणे जिल्ह्यात ग्रामीण स्ररावर जागृत लोकप्रतीनीधींनी हॉस्पिटलची नोंदणी योजनेत करुन जनआरोग्य लागू केली आहे.मात्र पूर्व हवेली तालुक्यात परिस्थिती उलटी असून लोणीकाळभोर येथे चालू योजना हॉस्पिटलने बंद केली आहे.तर वाघोली येथील केवळ एका नोंदीकृत हॉस्पिटलनी योजना चालू असली तरी किती लोकांना या योजनेतून फायदा मिळतो हा प्रश्न आहे. त्यामुळे पूर्व हवेली तालुक्यात अशा योजनांचा फायदा होत नसल्याची विदारक परिस्थिती डेंग्यू सारख्या खर्चिक आजारात दिसून आली आहे.
*’अंधेरी नगरी चौपट राजा’ हवेलीची स्थिती*
महात्मा फुले जनआरोग्य योजना गरीबांपर्यंत पोहचावी म्हणून दौंडचे लोकप्रतिनिधी कती सतर्क आहे .याचा अनुभव तेथील कामकाज पाहताना येत आहे.या तालुक्यात पाच हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून जनतेला लाभ मिळत आहे. परंतू हवेलीत चालू योजना हॉस्पिटल बंद करीत आहे. तरी योजना राबविण्यात लोकप्रतीनीधींना स्वारस्य आहे काय ? असा प्रश्न आहे.हवेलीचा कारभार अंधेरी नगरी चौपट राजा सारखा असल्याची विदारक स्थिती गरीब नागरीक अनुभवत आहे.
” महात्मा फुले जनआरोग्य योजना एमएबीएच प्रमाणपत्र असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये लागू आहे. अशा हॉस्पिटलमध्येया योजनेनुसार उपचार दिले जात आहे. पूर्व हवेलीत या योजनेत कोणती हॉस्पिटल उपलब्ध आहेत.याची माहिती दिली जाईल
-“डॉ.सुरेश भोर ,वैद्यकीय अधिकारी, हवेली