कोंढवा-सुखसागरनगर भागात दहशत माजविणाऱ्या गुंड मंगेश माने टोळीवर मोक्का कारवाई
पुणे : कोंढवा-सुखसागरनगर भागात दहशत माजविणारा गुंड मंगेश माने याच्यासह चार साथीदारांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
मंगेश अनिल माने (वय २६, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी), पवन रवींद्र राठोड (वय २३, रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक), सागर कृष्णा जाधव (वय ३०, रा. सासवड, ता. पुरंदर), अभिजित उर्फ जब्या सुरेश दुधनीकर (वय २१, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता), सूरज पाटील अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मंगेश माने आणि साथीदारांनी कोंढवा, सुखसागरनगर, अपर इंदिरानगर, कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. मानेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. माने आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, सहायक निरीक्षक विश्वास भाबड यांनी तयार केला होता.
या प्रस्तावास अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा मंजुरी दिली. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील २९ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.