छत्रपतीचे मैदान मारण्यासाठी पृथ्वीराज जाचक लागले कामाला! उद्या भवानीनगरमध्ये बोलावली सभासदांची बैठक…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर या कारखान्याच्या निवडणुकीची काल घोषणा करण्यात आली. यामुळे आता अनेकांनी तयारी सुरु केली आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक यांनी देखील मोठ्या न्यायालयीन लढ्यानंतर आता निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
यासाठी उद्या त्यांनी सभासदांची बैठक बोलावली आहे. श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानीनगर या कारखान्याच्या निवडणुकीच्या विचारविनिमयार्थ पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वाखाली रविवार दुपारी १२:३० वाजता छत्रपती मंगल कार्यालय भवानीनगर येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे आता रंगत वाढली आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची 7 एप्रिल 2025 रोजी निवडणूक जाहीर होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व स्वीकार करण्याची मुदत 7 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत पृथ्वीराज जाचक नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना हा राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाचा कारखाना असून सध्या कारखान्याची सत्ता अजित पवार गटाकडे आहे. मात्र गेल्या काही वर्षात कारखान्याला मिळालेला कमी बाजारभाव यामुळे सभासदांमध्ये नाराजी आहे. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक आहे.
या निवडणुकीमध्ये सध्या महायुती म्हणून अजित पवार आणि भाजप अशी युती होणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांची भूमिका देखील महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे कारखान्याला नेमके किती पॅनल उभे राहणार? कोणता गट कोणाला पाठिंबा देणार? यावर सगळं गणित अवलंबून आहे.
पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या गैरकारभाराविरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत छत्रपती कारखाना कसा कमी भाव देत आहे, याबाबत देखील त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली आहे. ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असून कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असल्याचे ते सांगत आहेत. यामुळे उद्याच्या बैठकीत याबाबत ते पुढील दिशा जाहीर करतील.