मुख्याधापिकेने पतीला संपवलं, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जंगलात जाळला अन्…,यवतामळमधील घटनेने खळबळ

यवतमाळ : यवतमाळमधील चौसाळा जंगलात १५ मे रोजी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या मृतदेहामागचं गुढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं आहे. पोलिस तपासात धक्कादायकउलगडा झाला असून मुख्याध्यापक पत्नीनेच पतीला विष देऊन त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू अरविंद देशमुख (वय. ३२, रा. सुयोगनगर) यांचा तो मृतदेह असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. शंतनू १३ मेच्या सायंकाळपासून बेपत्ता होता. तो सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता, तर त्याच ठिकाणी पत्नी निधी (वय. २३) ही मुख्याध्यापिका होती. प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता.

जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा १३ मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच आढळून आले होते. येथूनच पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली.

दरम्यान, पहिल्यांदा आरोपी पत्नी निधीने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय आधिक बळावला. तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करताच निधीने हत्येचा संपूर्ण घटनाक्रमच कबुलीतून सांगितला आहे. मृतदेह जाळण्यास मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
