राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला, पंतप्रधानांना मिळणार मान…!
मुंबई : अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या राम मंदिराचं काम प्रगती पथावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राम मंदिरात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्याचं स्वप्न अनेक रामभक्तांचं आहे. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या पूर्णत्वाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिराचं काम पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, अशी माहिती याआधीच प्राप्त झाली होती. मात्र, जानेवारी २०२४ च्या कोणत्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार याबाबत माहिती मिळाली नव्हती. ती माहितीही आता समोर आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भगवान रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रतिष्ठापना करतील, अशी माहिती मूर्ती आणि राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या प्रमुख सदस्याने काल (15 मार्च) माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मंदिरांचं बांधकाम जोरात सुरू आहे. जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाल भगवान रामाची मूर्ती मूळ जागी प्रतिष्ठापना करण्यात येईल. तसंच, मंदिराचं बांधकाम आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संबंध नाही. आम्ही फक्त आमचं काम करत आहोत, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी दिली.
भगवान रामाची मूर्ती मंदिरात स्थापित करण्यापूर्वी बराच काळ कापडी पंडालमध्ये ठेवण्यात आली आहे. आता देवतांना त्यांच्या मूळ जागेवर स्थानांतरित करण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले. मूर्ती मूळ ठिकाणी स्थानांतरित झाल्यानंतर मंदिरांचं काम सुरूच राहणार आहे. गर्भगृह, पहिल्या मजल्यावरील काम पूर्ण करून जानेवारी २०२४ पूर्वी दर्शनाची व्यवस्था करण्याचं आमचं ध्येय आहे, असंही स्वामी गोविंद देवगिरी यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मार्चनंतर अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे यांच्या सहाय्यकाने याबाबत माध्यमांना माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अयोध्येत जाऊन श्रीरामाची पूजा करण्यात येणार आहे.