अजित पवारांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शोकाकुल संदेश, शेअर केली भावनिक पोस्ट…

बारामती : आज महाराष्ट्रावर दु:खाच डोंगर कोसळलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा दुर्देवी विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ सकाळी पावणेनऊच्या सुमारास अजित पवार यांचं विमान लँडिंग करताना कोसळलं.

अजित पवारांसोबत या विमानात सहाजण होते. या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ च्या माध्यमातून शोक व्यक्त केलाय.


अजित पवार हे लोक नेते होते. तळागाळातील जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड आदराची भावना होती. ते मेहनती होते. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी ते सदैव पुढे असायचे. त्यांना प्रशासकीय विषयांची उत्तम समज होती.
समाजातील गरीब आणि पिचलेल्या घटकांसाठी ते खूप आत्मीयतेने, तन्मयतेने काम करायचे. ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. त्यांचं अकाली निधन ही खूप धक्कादायक आणि दु:खद बातमी आहे. त्यांचे असंख्य पाठिराखे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ओम शांती” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या निधनानंतर एक्सवर ही पोस्ट केलीय.
महाराष्ट्रात बारामती येथे झालेल्या विमान अपघाताच्या बातमीबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. या अपघातात ज्यांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं, त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे. या अतिशय दु:खद प्रसंगात ज्यांनी आपल्या स्वकीयांना गमावलय त्या कुटुंबांना बळ आणि हिम्मत मिळो अशी प्रार्थना करतो असं पीएम मोदींनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलय.
