विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने प्राथमिक शिक्षकाची आत्महत्या; आत्महत्येची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करा, राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी..
दौंड : एक शिक्षकी प्राथमिक शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या ‘बहुशिक्षकी’ शाळेत प्रवेश घेतल्याच्या कारणावरुन निराश झालेल्या शाळेतील ४६ वर्षीय शिक्षकाने वर्गातच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
ही घटना दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
अरविंद ज्ञानेश्वर देवकर (वय ४६, रा. निसर्ग सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ – मावडी पिंपरी ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
ते दोन महिन्यांपूर्वीच जावजीबुवाचीवाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती येथील प्राथमिक शाळेत बदलून आले होते.
या शिक्षकाच्या आत्महत्येची गुप्तचर यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात करुन संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
मिळालेल्या माहिती नुसार, दौंड तालुक्यातील होलेवस्ती ( जावजीबुवाचीवाडी जवळ ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक अरविंद ज्ञानेश्वर देवकर याने तणनाशक औषध पिऊन आत्महत्या केली आहे.
ही घटना शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराला काळिमा फासणारी आहे. अरविंद देवकर यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहिलेल्या सर्व बाबींची पोलीस प्रशासनाने व शालेय शिक्षण विभागाने सखोल चौकशी करावी.
शालेय शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा न पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच इतर काही स्थानिक लोकांनी वेगळा हेतू मनात ठेवून या शिक्षकाला मानसिक व शारीरिक त्रास दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
त्या स्थानिक नागरिकांचीही सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची प्रत प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.