पोलिसांवरील ताण कमी होणार! पुणे पोलीस दलात मोठ्या भरतीची घोषणा,’या’ तारखेपासून सुरूवात

पुणे: पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता पुणे पोलीस दलावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवरच आता पुणे पोलीस दलात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी आता हालचाली वेगवान झाल्या आहेत. यासाठीची संभाव्य तारीख समोर आल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

पुणे पोलीस दलात गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीची संभाव्य तारीखही समोर आली आहे.पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी अंदाजे 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. या शारीरिक चाचणीसाठी राज्यभरातून हजारो तरुण पुण्यात येण्याची शक्यता असून, पोलीस प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात केली आहे.
पुण्यातील या नवीन भरतीमुळे सध्याच्या पोलिसांना साप्ताहिक सुट्ट्या आणि कामाचे निश्चित तास मिळण्यास मदत होणार आहे. तसेचनवीन पोलीस ठाण्यांमध्ये पुरेसे संख्याबळ मिळाल्यास गस्त आणि तपासाला वेग येईल.खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

पुणे शहराची सध्याची लोकसंख्या पाहता, पोलीस दलात किमान 20 ते 21 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या केवळ 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. निम्म्या मनुष्यबळावर कामाचा ताण असल्याने पोलिसांना अनेकदा २४-२४ तास ‘ऑन ड्युटी’ राहावे लागते. त्यामुळे आता लवकरच पोलीस दलावरील ताण कमी होण्यासाठी ही भरती महत्वाची ठरणार आहे.
